Sunday, September 20, 2009

"जस्ट इमॅजिन"



काही काळ वडीलांच्या बदली निमित्त आम्ही ' मराठवाड्यात' राहिलो. बर्‍याचशा आठवणी बर्‍याच लक्षात रहाण्या सारख्या, अगदी ९३ साली झालेल्या दंगली च्या अनुभवा पासुन ते शेतात खालेल्या हुरड्यापर्यंत.
'गेवराई' नामक एका गावातल्या छोट्या खेड्यात आम्ही वडीलांच्या मित्राच्या शेतावर हुरडा खाण्यासाठी गेलो होतो. कधी हुरडा खाल्ला नसल्या मुळे आणी तो ही प्रत्यक्ष शेतात जाऊन वगरे, त्यामुळे , मला जाम अप्रुप वाटत होत. त्यामुळे मी ही जायला तयार झाले होते
पूर्वी फियाट अस्तित्वात होत्या तेव्हाची गोष्ट . आम्ही तिघ, (आई, वडील, मी ) वडीलांचे एक मित्र आणि त्यांची बायको एवढे सगळे एका फियाटीतुन गेलो होतो.
अगदी चित्रात दाखवल्या सारख शेत होत मस्त, वहाणारी नदी (मराठवाड्यात वहाणारी नदी , अजुन एक अप्रुप ) मस्त गेला दिवस. रात्री वडीलांच्या मित्राच्या आईने, आजींनी मस्त शेकोटी पेटवुन शेंगा वगरे भाजुन दिल्या, गरम गरम भाकरी पिठल, खाऊन भरल्या मनाने (आणि पोटाने) आम्ही परत निघालो. आजींचा आग्रह चाललेला "रात्री हिथच र्‍हावा की , कुट जाताय एवढ रातच्याला" पण दुसर्‍या दिवशी कॉलेज, क्लास सगळ डोळ्यासमोर दिसत असल्या मुळे आम्ही त्यांच्या आग्रहाला बळी न पडता निघालो. "जपून जा रे बाबांनो , जनावर , चोर, दरोडेखोर अस्त्यात रातच्याला थांबु नगा कुट" आजींचा प्रेमळ सल्ला.
रात्री चे ११ वाजले होते. आम्ही गेवराई गावात आलो. तिथुन बीडला पोचायच होत. टिपुर चांदण, रस्यावर मिट्ट काळोख ,आणी मागे पुढे एक देखिल गाडी नाही, अशा सुनसान रस्त्यावरुन आम्ही चिडीचुप पणे चाललो होतो. वडीलांचे मित्र ड्राईव्ह करत होते, आजीं नी दिलेला सल्ला मानायला हवा होता अस प्रत्येकाच्या मनात येऊन गेल. पण तरी काका भिती ने का होईना गाडी दामटत होते.
तेवढ्यात दोन डोळे चमकले आणि काहीही कळायच्या आत कार ची समोरची काच धाडकन फुटुन एक भल मोठ्ठ धुड आत आल आणि थेट काकांच्या मांडीवर आदळल. दोन मिनीट आम्हाला कोणालाच काहीच कळल नाही, गाडी समोरच्या शेतातल्या झाडावर धडकली. गाडीचा वेग आटोक्यात असल्याने थोडाच धक्का बसला. आम्ही पटापट खाली उतरलो बघतो तर काकांच्या मांडीवर ड्रायव्हींग करायच्या पवित्र्यात एक हरिण बसल होत. त्याच बुड काकांच्या मांडीवर, पुढचे दोन पाय स्टेअरींग वर आणि शिंग टपाला लागत होती, अगदी आता ते गाडी चालवेल अस वाटत होत. ते दृश्य बघुन हसाव का रडाव ते कळेना. इतक अनपेक्षित घडल सगळ. की आम्ही अक्षरशः आ वासुन बघत होतो.
काका त्याला हुर्र, हैश करुन घालवायचा प्रयत्न करत होते ,पण ते स्टेअरींग आणी काकांची मांडी यात अडकुन बसलेल. वडीलांनी त्यांच्या साईड च दार उघडुन त्याला ढोसल, की जेणे करुन ते पलिकडुन उडी मारुन जाईल, पण ते ही मान हलवुन निषेध नोंदवत होत. कारण काका आणी हरिण यांच्या पैकी कोणालाच हलता सुद्धा येत नव्हत्. प्रसंग बाका होता. मदती ला कोणी यायची शक्यताच नव्हती कारण आजुबाजुला किर्र झाडी आणी शेतांशिवाय काहीही नव्हत. एक ही गाडी मागुन पुढुन पास होत नव्हती. त्याही परिस्थितीत काका म्हणाले, अगदी अढळ पद मिळाल्या सारख बसलय शिंच, हलायला तयार नाही. मी ही त्याला त्याच डीयर वाटलो का काय ? काकु म्हणत होत्या "अहो उतरा की खाली, काय तुम्ही पण अगदी कौतुकाने मांडीवर घेतल्या सारख बसलायत." "अग पण हलता येत नाहीये, आणी बहुतेक त्यालाही आवडलय मांडीवर बसायला" इती काका. बाकी हरण किती गोड ,गोंडस दिसत असल तरी हरणाची पण भिती वाटु शकते तेव्हाच कळल. मधेच त्याचे खुर हॉर्न वर आदळले की कर्कश्श हॉर्न वाजत होता आणि त्याला घाबरुन ते आपल अढळ पद आणखीनच अढळ करत होत. त्या किर्र काळोखात तो हॉर्न भयाण वाटत होता. जस्ट इमॅजिन !!
आम्ही आमच्या परीने त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो, पण ते घाबरल्या मुळे कशालाच दाद देत नव्हत. त्या वेळी दृश्य अगदी फोटोजनिक होत. हरणाला मांडीवर घेतलेले काका, आजु बाजुने त्याला हाकलायचा प्रयत्न करणारे आम्ही, आणि शेतातल्या झाडावर आदळलेली गाडी. अगदी कैच्याकै.शेवटी म्हत्प्रयासाने वडीलांनी त्याचे त्याचे पुढचे खुर हातात घरुन जोरात ओढले आणी काकांच्या मांडी आणि स्टेअरींगच्या बेचक्यातुन त्याच बुड निघाल. त्या बरोब्बर काकांनी उजवी कडे आणि त्याने डावी कडे उडी मारली. आणी आमच्या कडे एक तुच्छ कटाक्ष टाकुन ते समोरच्या झाडीत दिसेनास झाल.
ह्या सगळ्या भानगडीत, काकांचा चष्मा फुटुन काचा गालात रुतल्या होता, हाताला प्रचंड खरचटुन रक्त येत होत, गाडीची समोरची काच पूर्ण फुटली होती. तरी त्यांची विनोद बुद्धी चांगलीच शाबुत होती.
त्या भर थंडीत सगळ्यांनाच घाम फुटला होता. काकांना तशा अवस्थेत गेवराईच्या सिव्हील हॉस्पिटल मधे घेऊन गेलो. रात्री च्या वेळी तिथे एक ज्युनियर डॉक्टर बाहेर आली आणी प्रथमोपचारा साठी काकांना आत घेऊन गेली , उपचार करताना ती विचारत होती कसा काय झाला अ‍ॅक्सीडेंट ?
अ‍ॅक्सीडेंट ?? अहो छे , हे सगळे हरणाचे प्रताप आहेत. काकांनी थोडक्यात तिला स्टोरी सांगीतली,
नक्की कुठुन आलेत हे अशा  अविर्भावात आळी पाळीने काकांकडे आणी बाबांकडे बघत होती. तिने टु बी अ‍ॅट सेफर साईड म्हणून सिनीयर डॉक्टर ना बोलवुन आणल.
काकांना कपाळाला दोन स्टिचेस घालावे लागले, डॉक्टरीण बाईंनी खरचटलेल्या जागी बँडेज लाऊन दिल. आम्ही पुन्हा भगदाड पडलेल्या गाडीतुन गार वारा अक्षरशः खात खात घरी आलो.
नंतर बरेच दिवस लोकांना हा विषय चघळायला पुरला.आमच्या वर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं आणि आम्ही ही गोष्ट विसरायला. नंतर काकांच नामकरण "हरणे काका" झालं.
काका म्हणले "बर झाल आपण हरणा मुळे वाचलो. थँक्स टु डियर "
आमच्या चेहेर्‍यावर प्रश्णचिन्ह . काका म्हणाले अरे जस्ट इमॅजिन हरणाच्या जागी वाघ किंवा बिबळ्या असता तर ??
हा अनुभव १०० % खरा आहे. ह्याची पुन्हा उजळणी व्हायच कारण म्हणजे , परवा "हरणे" काका आमच्या कडे येउन गेले . आणि आम्ही पुन्हा एकदा हरणा चा वाघ "जस्ट इमॅजिन" करुन मनसोक्त हसलो.