Monday, May 30, 2011

फॅशन फंडा

तिसर्‍या दुकानातूनही आम्ही निराश होऊन बाहेर पडलो. लहान मुलीसाठी जिन्स पँट घेण म्हणजे गुलबकावली च फुल शोधण्या एवढ कठिण असेल अस वाटल नव्हत. कारण अत्ता अत्ता पर्यंत वाढदिवसा साठी खरेदी ठरलेली असायची. एक मस्त घेरदार चिकन चा नाहीतर कॉटनचा,फ्रॉक, त्यातल्या त्यात गुलाबी किंवा तसाच कुठला तरी रंगाचा,त्याला मस्त मोठ्ठा बो बांधता येइल असा लांब पट्टा, त्यावर मॅचिंग पिना फार फार तर बेल्ट.झाली फॅशन. खरतर घेरदार फ्रॉक साठी सुद्धा काही कमी वणवण करावी लागायची नाही , पण निदान शिऊन तरी घेता यायचा.
पण "ह्या वर्षी च्या वाढदिवसाला कुठल्या रंगाचा फ्रॉक घ्यायचाय "? ह्या माझ्या प्रश्णाला लेकीने झुरळा सारख झटकला.
"शी , आई फ्रॉक काय ? आउटडेटेड, ओल्ड फॅशन झालाय फ्रॉक आता
मी काय आता लहान(?) आहे फ्रॉक घालायला "?
हे मला ही नविनच होत. थोड मोठ झाल्यावर, आपण फारच आउट ऑफ फॅशन कपडे घालतो, ह्याची तिव्र जाणीव तिला व्ह्यायला लागली होती आणि त्याचे चटके मला बसायला लागले होते. हो कारण भरदुपारी दीड दोन च्या चांदण्यात आम्ही "प्लेन" जीन्स शोधत लक्ष्मी रोडवर हिंडत होतो.

"मला मस्त पैकी एक प्लेन साधी, "सोबर" जिन्स आणि वर दोन/ तीन (?) टॉप एवढच घ्यायचय". "सोबर"वर जोर देत लेक म्हणाली. ह्या सोबर जीन्स पायी एवढ हिंडायला लागेल अस वाटल नव्हत. पण त्या परेड मुळे लेटेस्ट फॅशन शी निदान माझी तोंड ओळखतरी झाली. जीन्स मधे सुद्धा इतक्या असंख्य व्हरायटी असतात ह्यावर विश्वास बसत नव्हता.
ढोपरात फोल्ड केलेली, कुठे तरी आडव्या चिरा दिलेली, काही ठिकाणी ठिगळ लावलेली, खालून तुस निघालेली , उसवलेली. काही प्यांटींच्या पार्श्वभागावर "ब्युटीफुल गर्ल" "आय अ‍ॅम स्मार्ट" " प्रिटी गर्ल" असली निरर्थक वाक्य लिहिलेली. काही प्यांटीं वर , सध्या खोडरबरा पासून ते दप्तरा पर्यंत बोकाळलेली ,हॅना मॉटेना नामक (ओव्हर) स्मार्ट (?) मुलीची, हडळी सारख्या दिसणार्‍या बार्ब्यांची चित्र. भडक रंगाचे चकचकीत बेल्ट,टिकल्या, वर कुत्र्याच्या गळ्यात बांधतात तसल्या २/३ लोंबकाळणार्‍या चेन्स, खाली काही तरी छाप. इतक्या व्हरायटी बघीतल्या नंतर मला उगीचच इन्फिरेयोरिटी का काय तो काँप्लेक्स यायला लागला. लेक म्हणतेय ते खरय, फ्रॉक च नाही, खरतर आपणच आउट ऑफ फॅशन झालोय अस वाटायला लागल.
तेवढ्यात सेल्समन ने एक, एक विती पेक्षा थोडी मोठी असलेली जिन्स दाखवली. "मॅडम दोस्ताना मधे पी सी ने अशीच घातलीय, सध्याची लेटेस्ट फॅशन आहे" "पीसी" ?? म्हणजे कोण ?? . मला पीसी म्हंटल्यावर डोळ्यासमोर काँप्युटर शिवाय काहीच तरळेना. त्याने तत्परतेने उलगडा केला, "अहो पीसी म्हणजे प्रियांका चोपडा"
बापरे म्हणजे ह्या हिरविणी छोटे कपडे घालतात ते महिती होत, पण म्हणून लहान मुलांचे कपडे घालायचे ? काय फॅशन निघेल हल्ली सांगता येत नाही.
"अहो मॅडम तुम्ही उलट बोलताय, त्यालाच फॅशन म्हणतात. त्या नाही लहान मुलांचे कपडे घालत, हल्ली मुलांना लागतात त्यांच्यासारखे कपडे, त्यांनी ही कळते हल्ली लेटेस्ट फॅशन".
त्या वितभर प्यांटीची किंमत फक्त ८०० रु होती. चुकुन एखाद दोन शुन्य जास्त बघीतली का काय अशी शंका येऊन मी पुन्हा ती उगीचच उलटी पालटी करून बघीतली.
एक ही पँट पसंत पडत नाही म्हंटल्यावर, तो म्हणाला, "दुसर काय दाखवू ? वाढदिवसाला ,म्हणजे पार्टी वेअर हवा तुम्हाला रावण ड्रेस दाखवू का" ?
रावण ड्रेस ?? म्हणजे बहुतेक मंदोदरी त्या काळी घालत असावी, तोच आला असेल परत फॅशन म्हणून काय सांगाव, खर कोणी बघीतलय मंदोदरी कुठला ड्रेस घालत होती ते. डोक्यात असले असंबद्ध विचार धावायला लागले. आपल अज्ञान अजून कशाला प्रकट करा, अस विचार करून मी गप्प बसले. मनातला प्रश्ण ओळखून तो म्हणाला "रावण पिक्चर मधे ऐश्वर्या चा असाच ड्रेस आहे" माझ्या फॅशन च्या अगाध ज्ञानात अनमोल भर पडत होती. त्या ड्रेस ची किंमत बघीतली तर खर्‍या रावणाने देखील घेताना दहादा विचार केला असता.
"आई हा फारच जरभारी आहे" बहुतेक तिला भरजरी म्हणायच होत.
"अनारकली चालेल? का पार्टी वेअर गाऊन दाखवू "? लहान मुलांच्या खरेदीला गेल्या वर असले प्रश्ण फक्त विचारण्यासाठीच असतात हे मला कळून चुकल होत. "बघायला काय पैसे पडत नाही ताई" माझ फॅशनच ज्ञान बघून तो एकदम "मॅडम" वरुन "ताई" वर आला
"ए ३०२/३२ अनारकली आण" त्याने टिपीकल आवाजात वर माळ्यावर खुडबुडणार्‍या त्याच्या असिस्टंट ला आरोळी दिली. हे असले नंबर ह्यांच्या कसेकाय लक्षात रहातात कोण जाणे. अनारकली च्या नावाचा असा उल्लेख सलिम ने जर असा ऐकला असता तर सलिम ने त्याला त्या ड्रेस आणि मालका सकट भिंतीत चीणला असता.
त्यातल्या त्यात अनारकली बरा होता. पण त्याच्या बाह्या मच्छरदाणीच्या कापडाच्या का शिवल्या होत्या ते कळेना. हे म्हणजे भरजरी पैठणीला मांजरपाटाचा पदर तस काहीस वाटत होत. पण असेल बापडी लेटेस्ट फ्याशन म्हणून मी गप्प बसले. "आई ह्याला नेट म्हणतात मच्छरदाणीच कापड नाही" लेक कुजबुजली. "पण तरी मला हे पण नाही आवडल"
मी गप्प बसलेली बघून, मला तो ड्रेस आवडला अस वाटून , त्या सेल्स मन ला जरा हुरुप आला,
"मॅडम ह्याच्या अ‍ॅक्सेसरीज दाखवू ?" अ‍ॅक्सेसरीज ?? गाडीच्या, काँप्युटरच्या वगरे अ‍ॅक्सेसरीज माहिती होत्या, पण लहान मुलांच्या ड्रेसच्या अ‍ॅक्सेसरीज ??? त्याने खोक्यातून त्या अ‍ॅक्सेसरीज बाहेर काढल्या, त्यात नेकलेस, मॅचिंग बांगड्या, मोठे मोठे कानातले. "मॅचिंग मोजड्या खाली मिळतील तुम्हाला".
हे सगळ लहान मुलांना लागत ? शाळेत हल्ली फॅशन परेडचा तास ही सुरु केला की काय, अशी एक शंका मनात डोकावली. सगळ्याची मिळून किंमत बघीतली तर पुन्हा दोन तीन शून्य जास्त पडली का काय अस वाटून गेल.
मी एकदा स्वतःला चिमटा काढून बघीतला , आपण नक्की हिच्या वाढदिवसाच्या खरेदीलाच आलोय का लग्नाच्या ?
ते तसले कानातले बघून लेकीने सहा/ सात वर्षांपूर्वी घातलेल्या आपल्या बोळवलेल्या कानातल्यांकडे हात नेले आणि आम्ही एकमेकींकडे सुचक अर्थाने पाहिल.
त्या अनारकलीला तिच्या अ‍ॅक्सेसरीज सकट तिथेच सोडून आम्ही आमचा मोर्चा दुसर्‍या दुकानाकडे वळवला.
तिथेही असंख्य व्हरायटी बघितल्या, बॅक ओपन, लेगीन्स, अनारकली, रावण, बिभीषण फक्त आधी हे सगळ पाहिल्या मुळे माझा तसा थोडाफार होमवर्क झाला होता इतकच. फक्त तिथे लावलेली मॉडेल छोटुकल्यांचीपोस्टर्स मात्र "पीसी" ची किंवा "ऐश्वर्याची" बोनसाय वाटत होती. तशीच फॅशन, तसेच कपडे, तशाच पोझेस , अ‍ॅक्सेसरीज, स्टाईल, चेहेर्‍यावरचे भाव अगदी सगळ तस्सेच अकाली लहान पण हरवून मॉडेल्स बनलेले.
मुलीच्या शाळेत मागाच्याच वर्षी एक लेक्चर घेतल होत. त्यात शाळेत कुठले कपडे घालून येउ नयेत त्यावर बरच मोठ लेक्चर दिल गेल. मुळात अस लेक्चर द्यायची गरज भासण हेच मोठ दुर्दैव. बर्‍याच जणांना ते जाचक वाटत होत. जिथे पालकांनाच त्यात काही गैर वाटत नाही तर मुलांची काय चूक.
ह्या सगळ्या कपड्यातून शेवटी एक प्लेन जिन्स लेकीला आवडली आणि ती प्रत्यक्ष बघीतल्या वर चांदण्यात २ तास केलेली वणवण सार्थकी लागली अस वाटल. लेकीचा ही सध्याचा फॅशन फंडा बघून जरा हुश्श झाल.