Saturday, July 20, 2013

क्लास साठी दाही दिशा (दशा ?)



आजकाल दहावी , बारावीच्या मुलांसाठी आयपॅड , मोबाईल , टू व्हीलर ,फेसबुक ह्या जीवनावश्यक गोष्टीं बरोबर 'क्लास' ही पण एक जीवनावश्यक गोष्ट झाली आहे.  
मला नुकतीच एक "क्लास"टुर अनुभवायचा योग आला. माझ्या एका  बदली होऊन आलेल्या साउथइंडीयन  मैत्रीणी बरोबर, तिच्या नुकत्याच दहावीला गेलेल्या मुलीसाठी क्लासची  चौकशी करायला तिच्या बरोबर गाईड म्हणून  गेले होते.  त्या टुर ची ही थोडी झलक.

"आमच्या कडे चार कॅटॅगीरीस आहेत, सिल्व्हर्,गोल्ड्, डायमंड आणि प्लॅटीनम."
क्षणभर मला चुकून गाडगीळांच्या दुकानात आल्या सारख वाटलं .काही विचारायला क्षणाची ही उसंत न देता पुढचे ऑप्शन्स आले.
"सिल्वर मधे ३ युनिट टेस्ट आणि  २ प्रिलीम त्याची फीस ५५००/- गोल्ड मधे ५ युनिट आणि ३ प्रिलीम्स त्याचे ८५००/- रुपये , डायमंड मधे अमक तमक , अमुक आणि तमुक मिळुन पॅकेज घेतल तर १०% डिस्काउंट , चार च पॅकेज घेतल तर १२% डिस्काउंट शिवाय,कुठेही अ‍ॅड्मिशन मिळेल  एवढे मार्क्स मिळतील ह्याची हमी, ३ वर्कशॉप्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटस ची फ्री. शिवाय प्रोजेक्टस साठी ही मदतीची हमी".

त्यांच्या फीचा आकडा  ऐकुन, त्या फी  मधे  चारही क्याटॅगीरीतला निदान एकेक तरी दागिना आला असता असं आपल उगीचच वाटायला लागल.
पालकांनी केलेला दहावीचा बागुलबुआ, क्लासेस नी बरोब्बर कॅश केला होता.  आम्ही पुढच्या दुकानात निघालो.

"तुम्ही फार उशीर केलात". कोणाला सांगतायत म्हणून  आम्ही  मागे वळून बघीतलं, तर ते आम्हालाच सांगत होते. नक्की कशाला उशीर झाला हे  नकळून मी पटकन म्हणाले
"उशीर ? अहो पण ती तर याच वर्षी दहावीला गेलीय".
"आमच्या कडे दहावीसाठी च्या क्लासला , आठवी पासूनच मुल येतात. आमच तीन वर्षांच पॅकेज असतं. आता अ‍ॅडमिशन्स फुल झालेल्या असतात, त्यातून एखाद दुसरी कॅन्सल झाली तर कळवू. पण सातवी ला ८५% मार्क्स आवश्यक आहेत, तरच एन्ट्रन्स देता येइल".
"कसली एन्ट्रन्स "?  अगदी बावळट प्रश्ण विचारतोय हे  कळत होतं  तरी देखील मी विचारलच. उगीच शंकेला जागा नको.
"अहो क्लास साठीची प्रवेश परिक्षा".
बापरे म्हणजे क्लास मधे एन्ट्री मिळवायला आत्ता पासूनच मार्कांचा मेरु पर्वत  पार  करायचं होता .

मैत्रीण हताश झाली. ह्या  क्लासला प्रवेश मिळाला नाही तर शिक्षणाच्या सगळ्या वाटा आता खुंटणार असे काहीसे भाव होते मैत्रीणीच्या चेहेर्यावर.
लेकीच्या डोळ्यात पाणी आलं होतं  . आता शेवटच्या ठिकाणी एकदा बघूया क्लासची चौकशी करून. शिल्लक राहिलेला पेशन्स ट्राय करायला आमचा मोर्चा तिकडे वळवला.त्या बाईनी त्यांच्या दुकानाची माहिती सांगायला सुरवात  केली.
"आमचा क्लास सकाळी सहा वाजता सुरु होतो, तो अकरा ला संपतो.त्यामुळे  मुलं फार पेल असली की झेपत नाही त्याना एवढं  सगळं ". हे वाक्य तिने मैत्रीणीच्या मुलीच्या चेहेर्या कडे पाहून फेकलं  होतं. आता क्लास झेपण्या साठी एखाद जीम बीम पण चालवल जात का  काय अशी शंका आली.
आता शाळा सुटल्यावर क्लास च्या शोधार्थ दिवसभर वणवण केल्यावर चेहेरा टवटवीत कसा दिसणार होता कुणास ठाउक  ? मुलांना अभ्यास झेपेल की नाही हे चेहेर्यावरूनच  ताडण्याची एक अद्भुत शक्ती प्राप्त असल्याचा अभिमान त्या  बाईच्या वाक्यात आणि चेहेर्यावर  होता.
पुढची टेप परत विषयावर येऊन सुरु झाली.
"२८  मार्च पासून क्लास सुरु होतो  मे  महिन्याचा पहिला आठवडा फक्त सुट्टी, जूनच्या  पहिल्या आठवड्यात परिक्षा . मे  एंड ला सगळा पोरशन संपवतो नंतर फक्त टेस्टस द्यायच्या. आत्ता अडमिशन झाल्यात. ४ नंबर आहेत वेटींगला , तुमचा पण नंबर लाऊन ठेवायचाय का ?  त्यासाठी त्या साठी  सातवीत ८० मार्क असणं गरजेच आहे. प्रोस्पेक्टस घ्या आणि २००० रुपये अ‍ॅड्व्हान्स भरा. नाही मिळाली अ‍ॅडमिशन तर अ‍ॅड्व्हान्स परत मिळेल".
"आमचा निकाल १००% लागतो".  आता  इथे ही ८० % च्या पुढे मार्क मिळवणारी मुल घेतल्यावर १००% निकाल न लागला तरच नवल .
"मुलांना चित्त एकाग्रतेसाठी, दहावीच्या परिक्षेच टेंन्शन येऊ नये म्हणून अमुक तमुक बाबांच योगा  शिबीरही आम्ही ठेवतो, त्यात मेडीटेशन, प्राणायाम  योगा , हे सगळं  येतं / पण त्याचे ५०० रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील".  
"शिवाय आम्ही पालकांसाठी पण  एक वर्कशॉप घेतो. दहावीच्या काळात  मुलांशी कस वागावं, कसा संवाद साधावा , त्यांच्या वेळा कशा पाळाव्यात हे सगळ मार्गदर्शन आम्ही पालकांना करतो. त्याचेही ५०० रुपये वेगळे भरावे लागतील".
चला एका प्याकेज मधे  बरेच पक्षी मारले जाणार होते . मैत्रिणीने प्रॉस्पेक्टस घेतलं आणि आगाऊ पैसे भरले.

"अभिनंदन ! ९३.९६ टक्के मिळाले म्हणजे मस्तच ! आता कुठल्याही कॉलेजला अगदी सहज अ‍ॅडमिशन मिळेल".
मुलीचा दहावीचा निकाल लागल्या लागल्या मैत्रीणीने फोन केला होता.
छे गं , इतक कुठलं आलय आमच नशीब,  दीड टक्का अजून मिळाला असता तर एफ सी ची अ‍ॅडमिशन पक्की होती आणि डोके क्लासचीही,  नाही तर दहावीला फ्रेंच तरी घ्यायला हव होतं, बेस्ट ऑफ फाईव्ह......" मला पुढच काहीच ऐकु येइना.  इतके मार्क मिळवूनही ही अवस्था ?
"अगं ९३ म्हणजे कमी आहेत का" ?
 "नुसते ९३  नाही ९३.९६ अगदी पॉईट ला सुद्धा महत्व असतं  हल्ली". मैत्रीणीला नुसते  पॉईंट सुद्धा कमी झालेले नको होते. पॉईंट पॉईंट लढवून देखील समोर मोठ्ठ प्रश्ण चिन्ह होतच.
 "परत क्लासला अ‍ॅडमिशन मिळायला मार्कांची अट आहे" ? माझा अजून एक विसंगत प्रश्न
"अगं जरा हल्लीच्या जगात डोकवून बघ काय चाललय"   मी अगदीच मागच्या शतकात वावरतेय अस समजून मैत्रीण म्हणाली.
"परवाच एका क्लासची चौकशी करून आले अकरावी, बारावी,  सी ई टी अस प्याकेज आहे.साधारण एक लाख रुपयांपर्यंत . पण त्या शिवाय काय आहे ? ९० च्या वर मार्क मिळवायचे तर आपल्या कडून काही कमी पडायला नको.  इंजीनियरींगला अ‍ॅडमिशन हवी तर मार्कांशिवाय पर्याय  नाही"
"अग पण तिला विचारलस का" ?  मागे एकदा कधीतरी , जर्मन, संस्कृत भाषा पुढे शिकणार आहे अस काही तरी तिची लेक म्हंटल्याच आठवतं  होतं.
"तिला काय कळतय "? मैत्रीणीने तिच्या लेकी साठी काही करायच शिल्लक ठेवल नव्हतं. अगदी विचार सुद्धा.

"चल जरा माझ्या बरोबर तुझीही लेक दोन वर्षात येइल दहावीला, त्यासाठी हे  ट्रेलर बघायला मिळेल तुला".
बापरे हे ट्रेलर ?  म्हणजे पिक्चर अभी भी बाकी है ? मागच्या वेळच्या ट्रेलरचा धसका घेतल्याने पुन्हा तिच्या बरोबर  जायची माझी हिंमत झाली नाही.

सुट्टी

 

आई ग आज तु ऑफिसला मार ना ग बुट्टी
माझ्या साठी एकदिवस तरी काढ की ग सुट्टी
मस्त पैकी दोघी जणी नाटकाला जाऊ
येता येता गारेगार आईस्क्रिम खाऊन येऊ
मग आपण दोघीजणी खेळु भातुकली
मी होईन आई आणि तु हो माझी छकुली
मी ही मग तुला एकट ठेऊन ऑफिस मधे जाईन
येताना मात्र तुझ्यासाठी खाऊ घेऊन येईन
दुपारी मग मस्त पैकी कुशीत तुझ्या झोपेन
तुझी जुळवलेली गोष्ट पण मन लाऊन ऐकेन
सारखा तुझा पी सी आणि सारख्या तुझ्या मिटींगा
एक दिवस विसर सगळ ,घालु मस्त दंगा
प्रॉमिस !, तुला पुन्हा असा हट्ट करणार नाही
पुन्हा ऑफिस ला बुट्टी मारायला लावणार नाही
मग आई एकदिवस मारतेयस ना ग बुट्टी?
मस्त मजेत जाईल बघ मग माझी सगळी सुट्टी.

 

Monday, May 30, 2011

फॅशन फंडा

तिसर्‍या दुकानातूनही आम्ही निराश होऊन बाहेर पडलो. लहान मुलीसाठी जिन्स पँट घेण म्हणजे गुलबकावली च फुल शोधण्या एवढ कठिण असेल अस वाटल नव्हत. कारण अत्ता अत्ता पर्यंत वाढदिवसा साठी खरेदी ठरलेली असायची. एक मस्त घेरदार चिकन चा नाहीतर कॉटनचा,फ्रॉक, त्यातल्या त्यात गुलाबी किंवा तसाच कुठला तरी रंगाचा,त्याला मस्त मोठ्ठा बो बांधता येइल असा लांब पट्टा, त्यावर मॅचिंग पिना फार फार तर बेल्ट.झाली फॅशन. खरतर घेरदार फ्रॉक साठी सुद्धा काही कमी वणवण करावी लागायची नाही , पण निदान शिऊन तरी घेता यायचा.
पण "ह्या वर्षी च्या वाढदिवसाला कुठल्या रंगाचा फ्रॉक घ्यायचाय "? ह्या माझ्या प्रश्णाला लेकीने झुरळा सारख झटकला.
"शी , आई फ्रॉक काय ? आउटडेटेड, ओल्ड फॅशन झालाय फ्रॉक आता
मी काय आता लहान(?) आहे फ्रॉक घालायला "?
हे मला ही नविनच होत. थोड मोठ झाल्यावर, आपण फारच आउट ऑफ फॅशन कपडे घालतो, ह्याची तिव्र जाणीव तिला व्ह्यायला लागली होती आणि त्याचे चटके मला बसायला लागले होते. हो कारण भरदुपारी दीड दोन च्या चांदण्यात आम्ही "प्लेन" जीन्स शोधत लक्ष्मी रोडवर हिंडत होतो.

"मला मस्त पैकी एक प्लेन साधी, "सोबर" जिन्स आणि वर दोन/ तीन (?) टॉप एवढच घ्यायचय". "सोबर"वर जोर देत लेक म्हणाली. ह्या सोबर जीन्स पायी एवढ हिंडायला लागेल अस वाटल नव्हत. पण त्या परेड मुळे लेटेस्ट फॅशन शी निदान माझी तोंड ओळखतरी झाली. जीन्स मधे सुद्धा इतक्या असंख्य व्हरायटी असतात ह्यावर विश्वास बसत नव्हता.
ढोपरात फोल्ड केलेली, कुठे तरी आडव्या चिरा दिलेली, काही ठिकाणी ठिगळ लावलेली, खालून तुस निघालेली , उसवलेली. काही प्यांटींच्या पार्श्वभागावर "ब्युटीफुल गर्ल" "आय अ‍ॅम स्मार्ट" " प्रिटी गर्ल" असली निरर्थक वाक्य लिहिलेली. काही प्यांटीं वर , सध्या खोडरबरा पासून ते दप्तरा पर्यंत बोकाळलेली ,हॅना मॉटेना नामक (ओव्हर) स्मार्ट (?) मुलीची, हडळी सारख्या दिसणार्‍या बार्ब्यांची चित्र. भडक रंगाचे चकचकीत बेल्ट,टिकल्या, वर कुत्र्याच्या गळ्यात बांधतात तसल्या २/३ लोंबकाळणार्‍या चेन्स, खाली काही तरी छाप. इतक्या व्हरायटी बघीतल्या नंतर मला उगीचच इन्फिरेयोरिटी का काय तो काँप्लेक्स यायला लागला. लेक म्हणतेय ते खरय, फ्रॉक च नाही, खरतर आपणच आउट ऑफ फॅशन झालोय अस वाटायला लागल.
तेवढ्यात सेल्समन ने एक, एक विती पेक्षा थोडी मोठी असलेली जिन्स दाखवली. "मॅडम दोस्ताना मधे पी सी ने अशीच घातलीय, सध्याची लेटेस्ट फॅशन आहे" "पीसी" ?? म्हणजे कोण ?? . मला पीसी म्हंटल्यावर डोळ्यासमोर काँप्युटर शिवाय काहीच तरळेना. त्याने तत्परतेने उलगडा केला, "अहो पीसी म्हणजे प्रियांका चोपडा"
बापरे म्हणजे ह्या हिरविणी छोटे कपडे घालतात ते महिती होत, पण म्हणून लहान मुलांचे कपडे घालायचे ? काय फॅशन निघेल हल्ली सांगता येत नाही.
"अहो मॅडम तुम्ही उलट बोलताय, त्यालाच फॅशन म्हणतात. त्या नाही लहान मुलांचे कपडे घालत, हल्ली मुलांना लागतात त्यांच्यासारखे कपडे, त्यांनी ही कळते हल्ली लेटेस्ट फॅशन".
त्या वितभर प्यांटीची किंमत फक्त ८०० रु होती. चुकुन एखाद दोन शुन्य जास्त बघीतली का काय अशी शंका येऊन मी पुन्हा ती उगीचच उलटी पालटी करून बघीतली.
एक ही पँट पसंत पडत नाही म्हंटल्यावर, तो म्हणाला, "दुसर काय दाखवू ? वाढदिवसाला ,म्हणजे पार्टी वेअर हवा तुम्हाला रावण ड्रेस दाखवू का" ?
रावण ड्रेस ?? म्हणजे बहुतेक मंदोदरी त्या काळी घालत असावी, तोच आला असेल परत फॅशन म्हणून काय सांगाव, खर कोणी बघीतलय मंदोदरी कुठला ड्रेस घालत होती ते. डोक्यात असले असंबद्ध विचार धावायला लागले. आपल अज्ञान अजून कशाला प्रकट करा, अस विचार करून मी गप्प बसले. मनातला प्रश्ण ओळखून तो म्हणाला "रावण पिक्चर मधे ऐश्वर्या चा असाच ड्रेस आहे" माझ्या फॅशन च्या अगाध ज्ञानात अनमोल भर पडत होती. त्या ड्रेस ची किंमत बघीतली तर खर्‍या रावणाने देखील घेताना दहादा विचार केला असता.
"आई हा फारच जरभारी आहे" बहुतेक तिला भरजरी म्हणायच होत.
"अनारकली चालेल? का पार्टी वेअर गाऊन दाखवू "? लहान मुलांच्या खरेदीला गेल्या वर असले प्रश्ण फक्त विचारण्यासाठीच असतात हे मला कळून चुकल होत. "बघायला काय पैसे पडत नाही ताई" माझ फॅशनच ज्ञान बघून तो एकदम "मॅडम" वरुन "ताई" वर आला
"ए ३०२/३२ अनारकली आण" त्याने टिपीकल आवाजात वर माळ्यावर खुडबुडणार्‍या त्याच्या असिस्टंट ला आरोळी दिली. हे असले नंबर ह्यांच्या कसेकाय लक्षात रहातात कोण जाणे. अनारकली च्या नावाचा असा उल्लेख सलिम ने जर असा ऐकला असता तर सलिम ने त्याला त्या ड्रेस आणि मालका सकट भिंतीत चीणला असता.
त्यातल्या त्यात अनारकली बरा होता. पण त्याच्या बाह्या मच्छरदाणीच्या कापडाच्या का शिवल्या होत्या ते कळेना. हे म्हणजे भरजरी पैठणीला मांजरपाटाचा पदर तस काहीस वाटत होत. पण असेल बापडी लेटेस्ट फ्याशन म्हणून मी गप्प बसले. "आई ह्याला नेट म्हणतात मच्छरदाणीच कापड नाही" लेक कुजबुजली. "पण तरी मला हे पण नाही आवडल"
मी गप्प बसलेली बघून, मला तो ड्रेस आवडला अस वाटून , त्या सेल्स मन ला जरा हुरुप आला,
"मॅडम ह्याच्या अ‍ॅक्सेसरीज दाखवू ?" अ‍ॅक्सेसरीज ?? गाडीच्या, काँप्युटरच्या वगरे अ‍ॅक्सेसरीज माहिती होत्या, पण लहान मुलांच्या ड्रेसच्या अ‍ॅक्सेसरीज ??? त्याने खोक्यातून त्या अ‍ॅक्सेसरीज बाहेर काढल्या, त्यात नेकलेस, मॅचिंग बांगड्या, मोठे मोठे कानातले. "मॅचिंग मोजड्या खाली मिळतील तुम्हाला".
हे सगळ लहान मुलांना लागत ? शाळेत हल्ली फॅशन परेडचा तास ही सुरु केला की काय, अशी एक शंका मनात डोकावली. सगळ्याची मिळून किंमत बघीतली तर पुन्हा दोन तीन शून्य जास्त पडली का काय अस वाटून गेल.
मी एकदा स्वतःला चिमटा काढून बघीतला , आपण नक्की हिच्या वाढदिवसाच्या खरेदीलाच आलोय का लग्नाच्या ?
ते तसले कानातले बघून लेकीने सहा/ सात वर्षांपूर्वी घातलेल्या आपल्या बोळवलेल्या कानातल्यांकडे हात नेले आणि आम्ही एकमेकींकडे सुचक अर्थाने पाहिल.
त्या अनारकलीला तिच्या अ‍ॅक्सेसरीज सकट तिथेच सोडून आम्ही आमचा मोर्चा दुसर्‍या दुकानाकडे वळवला.
तिथेही असंख्य व्हरायटी बघितल्या, बॅक ओपन, लेगीन्स, अनारकली, रावण, बिभीषण फक्त आधी हे सगळ पाहिल्या मुळे माझा तसा थोडाफार होमवर्क झाला होता इतकच. फक्त तिथे लावलेली मॉडेल छोटुकल्यांचीपोस्टर्स मात्र "पीसी" ची किंवा "ऐश्वर्याची" बोनसाय वाटत होती. तशीच फॅशन, तसेच कपडे, तशाच पोझेस , अ‍ॅक्सेसरीज, स्टाईल, चेहेर्‍यावरचे भाव अगदी सगळ तस्सेच अकाली लहान पण हरवून मॉडेल्स बनलेले.
मुलीच्या शाळेत मागाच्याच वर्षी एक लेक्चर घेतल होत. त्यात शाळेत कुठले कपडे घालून येउ नयेत त्यावर बरच मोठ लेक्चर दिल गेल. मुळात अस लेक्चर द्यायची गरज भासण हेच मोठ दुर्दैव. बर्‍याच जणांना ते जाचक वाटत होत. जिथे पालकांनाच त्यात काही गैर वाटत नाही तर मुलांची काय चूक.
ह्या सगळ्या कपड्यातून शेवटी एक प्लेन जिन्स लेकीला आवडली आणि ती प्रत्यक्ष बघीतल्या वर चांदण्यात २ तास केलेली वणवण सार्थकी लागली अस वाटल. लेकीचा ही सध्याचा फॅशन फंडा बघून जरा हुश्श झाल.

Tuesday, August 31, 2010

सुरांची कोडी घालणारा संगीतकार

 

सलिलदां च्या 'गाण्याशी' पहिली ओळख झाली,कॉलेज जीवनात. त्यांच्या आनंद चित्रपटातल्या गाण्यांनी अक्षरश: वेड लागल होत, अगदी कॉलेजच्या गॅदरींग मधे म्हणायला सुद्धा ' ना जिया लागे ना' गाण्या ची निवड केली होती. त्या गाण्याच्या सुरावटींनी, चालीने अगदी भुरळ घातली होती. गाण तयार करताना त्यांच्या 'हटके' संगीत शैलीची साधारण कल्पना आली .
तशी त्यांच्या संगीताची माझी ओळख, आनंद, छोटीसी बात,काबुलीवाला,मधुमती इ. चित्रपटातल्या गाण्यांपुरतीच आणि एखाद्या कार्यक्रमा साठी गाणी तयार करण्यापुरतीच मर्यादित होती, किंवा कदाचित तेव्हढ्या पुरतीच मर्यादितही राहिली असती.
पण बर्‍याच वर्षा नंतर, त्यांना वाहिलेली http://www.salilda.com/ ही साईट मिळाली आणि त्यांच्या विविध शैलीतल्या गाण्यांचा जणू खजिनाच अचानक हाती लागला. पुन्हा एकदा नव्याने सलीलदां च्या गाण्याशी, त्यांच्या शैलीशी ओळख झाली. त्या साईट मुळे आणि त्यात सापडलेल्या अप्रतिम गाण्यांमुळे. त्यांनी संगीत दिलेल प्रत्येक गाण ऐकताना अगदी अलीबाबाच्या गुहेत शिरल्या सारख वाटल.

१९ नोव्हेंबर १९२२ साली पश्चिम बंगाल मधल्या, गंजीपूर मधे त्यांचा जन्म झाला. त्यांच बरचस बालपण आसाम मधे गेल.तिथेच संगीताची पाळमुळं खोलवर त्यांच्या मनात रुजली गेली, त्यांच्या डॉक्टर वडीलांमुळे. त्यांचे वडीलही वेस्टर्न क्लासिकल संगीताचे भोक्ते होते. लहानपणापासून त्यांच्यावर झालेल्या वेस्टर्न क्लासीकल संगीताचा आसामी,बंगाली लोकगीतांचा प्रभाव त्यांच्या बर्‍याच गाण्यातून दिसून येतो. हिंदी चित्रपट संगीतात वेस्टर्न क्लासिकलचा इतक्या लवचिकतने वापर करणारे ते बहुधा पहिलेच संगीतकार होते.
त्याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोझार्टच्या ४० व्या सींफनी वर बेतलेल छाया चित्रपटातल "इतना ना मुझसे तु प्यार बढा" हे लताजीं आणि तलतच्या आवाजातल अफलातून गाण. मला वाटत सलिलदांच्या संगीता मुळे ह्या गाण्यातून व्यक्त होणारे भाव शब्दां इतकेच, कदाचित जास्त प्रभावी ठरतात. खाली दिलेल्या लिंक मधे मूळ धुन ऐकु शकता.
http://www.youtube.com/watch?v=aZD9nt_wsY0
त्यांच्या एकेका गाण्यातून त्यांची अनोखी शैली उलगडत गेली, दरवेळेस नविन अनूभूती देणारी, आता आपल्याला समजली अस वाटेपर्यंत परत कोड्यात टाकणारी,अचंबीत करणारी,कुठलाही साचेबद्धपणा नसलेली, एखाद्या अवखळ झर्‍या सारखी प्रवाही.
त्यांनी कुठल्या ही प्रकारच शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल नव्हत,पण ते एक उत्तम गायक , बासरी वादक होते. वयाच्या आठव्या वर्षा पासून ते बासरी वाजवायला लागले. त्यांच्या ऑर्केस्ट्रॉ मधे काम करणार्‍या भावा मुळे त्यांचे तबला,सतार,व्हायोलिन अशा काही वाद्यांशी सुर जुळले होते एवढच, पण परख चित्रपटातल लताजींच्या स्वर्गीय आवाजातल अजरामर गाण "ओ सजना बरखा बहार आई" (हे लताजींच्या सुद्धा आवडत्या दहातल एक गाण) छाया चित्रपटातल बसंत बहार रागात रचलेल "छम छम नाचत आई बहार" , जागते रहो मधल "ठंडी ठंडी सावन की " किंवा चांद और सुरज मधल " झनन झनन बाजे" ही शास्त्रीय संगीतावर आधारीत गाणी ऐकल्या नंतर, त्यांनी शास्त्रीय संगीताच शिक्षण घेतल नव्हत ह्या गोष्टी वर विश्वास बसत नाही, पण "दैवी देणगी" ह्या संकल्पने वर मात्र विश्वास बसतो
"छम छम नाचत आइ बहार " या गाण्यात त्यात वापरलेली निरनिराळी वाद्य आणि त्याचा अत्यंत संयमित वापर अचूक परिणाम साधतात.
झनन झनन बाजे, मधल कळत नकळत जाणवणार फ्युजन अफलातून आहे. गाण्यात मुखडा पूर्ण हिंदुस्तानी क्लासीकल आणि अंतर्‍याची चाल, किंचीत पाश्चिमात्य ढंगा कडे झुकणारी, त्यातल्या मुखड्याच्या वेगवेगळ्या जागा ...हे असल जबरदस्त काँबीनेशन केवळ त्यांनाच सुचु शकत.
त्यांनी "कोरस" चे वेगवेगळे प्रयोग आपल्या गाण्यात यशस्वी पणे केले. त्यांची अनेक गाणी याची साक्ष देतात, जशी परख मधल "मेरे मन के दिये", किंवा छोटीसी बात मधल "न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ" किंवा अन्नदाता मधल "रातों के साये घने" मधला उत्तरार्धातला भाग . त्यात वापरलेल्या कोरस मुळे नायिकेच्या मनातली आंदोलन जास्त प्रभावी पणे व्यक्त होतात.
ते स्वतः उत्कृष्ट कवी,लेखक नाटककार होते , त्यामुळेच कदाचित त्यांच्या प्रत्येक गाण्यातुन, त्यातले भाव नेमक्या स्वरातून उमटतात आणि थेट हृदया पर्यंत पोचतात. "ए मेरे प्यारे वतन " हे एकच गाण सलिल म्हणजे काय ते जाणून घ्यायला पुरेस आहे. घराच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या पठाणाची तडफड इतक्या प्रभावी पणे कुठल्या गाण्यातून व्यक्त होऊ शकेल ?
गाण्यातल्या शब्दांना जिवंत करणार्‍या लांबच लांब पल्लेदार चाली ही त्यांची खासीयत होती. लताजींच्या आवाजातल हनिमून चित्रपटातल "अहा रे मगन मेरा चंचल मन" ,परख चित्रपटातल "ये बन्सी क्युं गाये" किंवा झुला मधल "सजना मेरा दिल तेरा दिल गया मिल" सारखी गाणी ही त्याचीच उत्कृष्ट उदाहरणं.
लहान पणापासून आपण वेगवेगळ्या प्रकाराच संगीत ऐकतो. त्याचा कळत नकळत एक विशिष्ट परिणाम आपल्या कानावर झालेला असतो ,त्यामुळे गाण्याची सुरवात ऐकली की पुढच्या विस्ताराची साधारण कल्पना आपण करू शकतो. बहुतेक संगीतकारांच्या चाली ह्या कल्पनेशी फारकत घेणार्‍या नसतात .सलीलदांची चाल मात्र प्रत्येक वळणावर थक्क करून जाते. आपल्याला ही सुरावट कळल्याच पुरेस समाधान मिळत न मिळत तो पर्यंत पुढची सुरावट आपल्याला गुंतवून टाकते.
त्यांच 'जीना यहाँ 'चित्रपटातल्या "ओ शाम आई रंगो मे रंगी हुई " हे त्याच एक उत्कृष्ट उदाहरण लताजीं च्या आवाजातल्या ह्या गाण्याची सुरावट अक्षरशः वेड लावणारी आहे . खास सलिलदांची सिग्नेचर असणार गाण, त्या गाण्यातून व्यक्त होणारी नायिकेचीह हुरहुर, तिच आशादायी स्वप्न थेट भिडतं, ते केवळ त्यांनी दिलेल्या अनवट अशा चाली मुळे.
प्रयोगशीलता आणि नाविन्य हा त्यांचा स्थायी भाव असावा,जो त्यांनी संगीत दिलेल्या प्रत्येक गाण्यातून जाणवतो. अनेकप्रकारच्या वाद्यांचा, लोकसंगीताचा प्रभावी वापर हे त्यांच्या गाण्यात ठळक पणे जाणवणार वैशिष्टय . त्यामुळेच बहुतेक आजही त्यांच प्रत्येक गाण चिरतरुण वाटत.
आवाज चित्रपटातल "दिल धितांग धितांग बोले" गाण ऐकून पहा. या गाण्यात सुरवातीची ढोलकी नंतरच्या गाण्याच्या चालीशी थोडी विसंगत वाटते, पण नंतरची संपूर्ण गाण्याची चाल गोव्यातल्या लोकगीताची आठवण करुन देते.
चांद और सुरज चित्रपटातल्या " उनकी मेरी प्रीत पूरानी " ह्या गाण्याला दिलेल्या संगीतात त्यांनी लावणीचे बारकावे इतके अचूक टिपलेत, की बंगाली संगीतकाराची रचना आहे ह्यावर विश्वास बसण कठीण जाव . आशा बाईं च्या धारदार आवाजात ही लावणी हिंदी असून ही मराठी लावणी इतकीच खणखणीत वाटते.
त्यांना स्वतःची अशी पठडी बाहेरची स्वतंत्र शैली निर्माण करायची होती. एकाच वेळी गीतकार,संगीतकार ,संयोजक म्हणून काम करणार्‍या ह्या संगीतकाराचे सुर, निरनिराळ्या सुरावटी,त्यातल नाविन्य ह्या बद्दल चे विचार , संशोधन , व्याप्ती अक्षरश: थक्क करणारी होती, जी त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जाणवते, व्यक्त होते. त्याचा पूरेपूर प्रत्यय देणारी ही त्यांची काही अप्रतिम गाणी -
१)चांद रात तुम हो साथ - हाफ टिकीट
२)वो एक निगाह क्या मिली - हाफ टिकीट
३)आंखो मे तुम दिल में तुम - हाफ टिकीट
४)जा तोसे नही बोलु कन्हैय्या - परिवार
५)ओ हाय कोई देख लेगा - एक गांव की कहानी
६) अकेला तुझे जाने ना दूंगी - चार दिवारी
७)बाग में कली खिली - चांद और सुरज
८)जागो मोहन प्यारे - जागते रहो
९)घडी घडी मोरा दिल धडके - मधुमती
१०)चढ गयो पापी बिछुआ - मधुमती
११)न जाने क्यूं होता है ये जिंदगी के - छोटीसी बात
१२)जिंदगी कैसी ये पहेली हाए- आनंद
सलिलदांनी काही चित्रपटांना आणि माहिती पटांना फक्त पार्श्वसंगीत दिलय,केवळ त्या पार्श्वसंगीता वरून चित्रपटाच्या कथानका ची कल्पना यावी इतक प्रभावी त्यासाठी ही ते फार प्रसिद्ध होते , त्यामुळेच कदाचित बिमल रॉय नी त्यांच्या कडून देवदास साठी फ़क्त पार्श्व संगीत करून घेतल असाव. अस संगीत देणारे ते पहिलेच संगीतकार होते.
मुकेश च्या आवाजाचा उपयोग सलीलदां एवढा उत्कृष्ट पणे, कदाचित कुठल्याही संगीतकाराने करून घेतला नसेल. त्यांनी संगीत दिलेली गाणी मुकेश च्या आवाजात ऐकताना ती केवळ त्याच्या आवाजासाठीच त्यांनी बनवली असावित अस वाटत . अतिशय गोड आणि मधुर अशा चालींची भावपूर्ण, प्रसन्न गाणी त्यांनी मुकेशच्या आवाजात गाउन घेतली. तरल ,भावपूर्ण पण तरी ही विशेष लोकप्रिय नसलेल मुकेश आणि लताजींच्या आवाजातल पूनम की रात चित्रपटातल द्वंद्व गीत " तुम कहां ले चले हो " , अतिशय प्रसन्न सुरावटींच छोटीसी बात चित्रपटातल मधल "ये दिन क्या आये" , हनीमून मधल "मेरे ख्वाबो मे खयालो में", तर छाया मधल "दिलसे दिल की डोर बांधे", ही गाणी ऐकल्या नंतर, मुकेश म्हणजे 'दर्दभरी' गाणी हे समिकरण पूर्ण पणे विसरायला होत.
संगीतात ,प्रतिभेला भाषेचा अडसर नसतो , त्यांनी तेलगू ,मल्याळम , कन्नड़ ,गुजराती ,उडीया, मराठी अशा अनिकविध भाषेतील गाण्याना संगीत दिल. मल्याळम चित्रपट "चेमिने " मधल्या एका गाण्यासाठी ह्या बंगाली संगीतकाराला केरळ सरकारने श्रेष्ठ संगीतकार पुरस्काराने गौरवल होत.
५ सप्टेंबर ला ह्या अष्टपैलू संगीतकाराला काळाच्या पडद्या आड जाऊन पंधरा वर्ष होतील, तरी
आजही त्यांच संगीत चिरतरुण वाटत, त्यांनी संगीतबध्द केलेली गाणी कितीदा ऐकली तरी प्रत्येक वेळेला नाविन्याची अनुभूती देतात. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून उलगडत गेलेल्या त्यांच्या प्रवाही शैलीच आकर्षण कधी ही न संपणार आहे, म्हणूनच त्याचा शोध ही कधी न लागणारा न संपणारा ,आपणही त्या प्रवाहात फक्त सामावून जायच बस्स तेवढच फक्त आपल्या हातात आहे.
टीपः वर दिलेली सगळी गाणी तुम्हाला http://www.salilda.com/ ह्या साईट वर ऐकायला मिळतील
गुरुदत्त  सोहोनी   च्या मदती मुळे हा लेख तुमच्या पर्यंत पोहोचवण शक्य झाल, तेव्हा गुरुदत्त  सोहोनी ला   अनेक धन्यवाद.

Wednesday, June 2, 2010

शूरवीराचा पोवाडा शूर महिलेनेही गावा

शाहिर म्हंटल की डोळ्यासमोर येतं ते बुलंद आवाजाच, तडफदार , रांगड व्यक्तीमत्व. पण ह्या आपल्या समजुतीला पूर्ण पणे छेद जातो तो शाहिर विनिता च्या बुलंद, तडफदार वीररस पूर्ण आवाजातला पोवाडा ऐकल्यावर.
आश्चर्य वाटतय ना ? एक महिला आणि शाहिर ? हे समिकरण तस न जुळणार वाटत ना ?
नुकताच सावरकर स्मृतीदिना निमित्त विनताशी गप्पा मारण्याचा योग आला. तिने गप्पां मधून अगदी तिच्या अनुभवांचा खजिनाच उघडला . अशाह्या तेजस्वी महिला शाहिराशी तुमची ही ओळख करुन देण अनिवार्य वाटल
विनता काळे -जोशी, मुळची नाशिकची, नारायण सावरकर ( विनायक सावरकरांचे धाकटे बंधू) यांची नात. त्यामुळे राष्ट्र प्रेमाच बाळकडू घरातूनच मिळालेल. दहावीत असल्या पासूनच तिने पोवाडे म्हणायला सुरवात केली.

१९८३ साली साली सावरकर जन्मशताब्दी निमित्त सावरकरांच्या कार्याचा प्रचार करण्याच्या हेतूने तिने सावरकरांची अपरिचीत गाणी लोकांपुढे सादर केली आणि त्या नंतर तिने मागे वळून बघीतले नाही. आज पर्यंत अव्याहत पणे तीची घोडदौड चालू आहे

१९८३ साली साली सावरकर जन्मशताब्दी निमित्त सावरकरांच्या कार्याचा प्रचार करण्याच्या हेतूने तिने सावरकरांची अपरिचीत गाणी लोकांपुढे सादर केली आणि त्या नंतर तिने मागे वळून बघीतले नाही. आज पर्यंत अव्याहत पणे तीची घोडदौड चालू आहे
"अनादी मी अनंत मी", शस्त्रगीत ,हिंदू एकता गीत अशी अनेक वीर गीत , सावरकरांचा पोवाडा, शिरीष कुमार, झाशीची राणी , तानाजी वर रचलेला पोवाडा असे अनेक पोवाडे ती तडफेने सादर करते. दमदार, बुलंद आवाज, डोक्यावर फेटा आणि हातात डफ अशा पुरुष शाहिराला लाजवेल अशा आवेशात विनता पोवाडा सादर करते
रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी निमित्त 'शाहिरी रात्र' हा महाराजांच्या पराक्रमाच्या आठवणी जागवणारा कार्यक्रम होता, सगळ्या पुरुष शाहिरांमधे विनता एकटी स्त्री शाहिर होती, आणि अत्यंत तडफदार पणे तिने पोवाडा सादर करुन कार्यक्रम गाजवला
सुमारे ५०० च्या वर पोवाड्याचे कार्यक्रम तिने अनेक ठिकाणी सादर केले.
विहिंप च्या जनजागरण कार्यक्रमात, लासलगाव, कळवण, सिन्नर, ओझर, सैद, पिंपरी, मनमाड अशा खेडेगावातून, तसेच कनाशि , अभोणा, चणकापूर, मोखाडा , खोडाळा अशा अनेक आदिवासी भागातून हिंदु जनजागरणच्या निमित्ताने तिने असंख्य कार्यक्रम सादर केले. हिंदु जनजागरण मोहिमेत ही तिचा सक्रिय सहभाग होता
तिला तिच्या या वाटचालीत तिच्या सहकलाकारांनी ही उत्तम प्रकारे साथ केली. त्यातल्याच शोभाताई ठाकूर, दिपा पुरोहित. त्यांच्या पुढाकाराने तिने "स्वरमंडळ" ची स्थापना केली आणी आता स्वरमंडळ तर्फे विनता सध्या पोवाड्याचे अनेक कार्यक्रम सादर करते.
कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता विनता केवळ राष्ट्रप्रेम जनमानसात निर्माण व्हावे, तळागाळापर्यंत आपल्या राष्ट्राचा इतिहास पोचावा ह्या हेतुने ती पोवाड्याचे कार्यक्रम सादर करते. कार्यक्रमातून मिळणारा काही निधी , सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सामाजिक कार्यासाठी आवर्जून देते.
नुकताच सावरकर स्मृतीदिना निमित्त तिने पुण्यात डोणजे फाटा इथे झोपडपट्टीतल्या मुलांसाठी कार्यक्रम सादर केला. सुरवातीला चुळबुळणारी मुल नंतर अक्षरशः भारावून गेली होती.
आपण मुलांना चांगल दिल तर मुलांची ही ती घ्यायची तयारी असते , नव्हे ती घेतात, याचा नुकताचा अनुभव तिच्या मॉडर्न कॉलेजमधे झालेल्या कार्यक्रमात आला. सगळी नव्या पिढीतली तरुण मुलमुली कार्यक्रमाला उपस्थित होती. हॉल मधे भारावलेली शांतता होती. नंतर सगळ्या मुलांनी तिची स्वाक्षरी घेण्यासाठी एकच गर्दी केली. हिच तिच्या दृष्टीने मिळालेली मोठी पावती. सिनेनटांच्या मागे वेड्या झालेल्या आजच्या पिढीला विनताच्या पोवाड्यांनी भारावून टाकल होत.
पु.ल.देशपांडे, बाबासाहेब देवरस , हिंदु महासभेचे नेते विक्रम सावरकर , शंकर अभ्यंकर अशा अनेक मान्यवरांकडून विनताला कौतुकाची थाप मिळाली आहे. श्री.शंकर अभ्यंकरांच्या व्याख्यान मालेत तिने सावरकरांचा पोवाडा गाऊन, त्यांच्या कडून शाबासकी मिळवली .अल्फा टीव्ही मराठी, दूरदर्शन वर देखील तिच्या कार्यक्रमांची आवर्जून दखल घेतली गेली. पुण्यातल्या सावरकर स्मृती स्मारकाच्या उदघाटन प्रसंगी बाबासाहेबांच्या हस्ते मानचिन्ह देऊन विनताला गौरवण्यात आल. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पुणेमहापालिकेने सन्मानचिन्ह देऊन तिच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा खोवला.
अशा या तडफदार , तेजस्वी शाहिराला मानाचा मुजरा !!!!

Sunday, September 20, 2009

"जस्ट इमॅजिन"



काही काळ वडीलांच्या बदली निमित्त आम्ही ' मराठवाड्यात' राहिलो. बर्‍याचशा आठवणी बर्‍याच लक्षात रहाण्या सारख्या, अगदी ९३ साली झालेल्या दंगली च्या अनुभवा पासुन ते शेतात खालेल्या हुरड्यापर्यंत.
'गेवराई' नामक एका गावातल्या छोट्या खेड्यात आम्ही वडीलांच्या मित्राच्या शेतावर हुरडा खाण्यासाठी गेलो होतो. कधी हुरडा खाल्ला नसल्या मुळे आणी तो ही प्रत्यक्ष शेतात जाऊन वगरे, त्यामुळे , मला जाम अप्रुप वाटत होत. त्यामुळे मी ही जायला तयार झाले होते
पूर्वी फियाट अस्तित्वात होत्या तेव्हाची गोष्ट . आम्ही तिघ, (आई, वडील, मी ) वडीलांचे एक मित्र आणि त्यांची बायको एवढे सगळे एका फियाटीतुन गेलो होतो.
अगदी चित्रात दाखवल्या सारख शेत होत मस्त, वहाणारी नदी (मराठवाड्यात वहाणारी नदी , अजुन एक अप्रुप ) मस्त गेला दिवस. रात्री वडीलांच्या मित्राच्या आईने, आजींनी मस्त शेकोटी पेटवुन शेंगा वगरे भाजुन दिल्या, गरम गरम भाकरी पिठल, खाऊन भरल्या मनाने (आणि पोटाने) आम्ही परत निघालो. आजींचा आग्रह चाललेला "रात्री हिथच र्‍हावा की , कुट जाताय एवढ रातच्याला" पण दुसर्‍या दिवशी कॉलेज, क्लास सगळ डोळ्यासमोर दिसत असल्या मुळे आम्ही त्यांच्या आग्रहाला बळी न पडता निघालो. "जपून जा रे बाबांनो , जनावर , चोर, दरोडेखोर अस्त्यात रातच्याला थांबु नगा कुट" आजींचा प्रेमळ सल्ला.
रात्री चे ११ वाजले होते. आम्ही गेवराई गावात आलो. तिथुन बीडला पोचायच होत. टिपुर चांदण, रस्यावर मिट्ट काळोख ,आणी मागे पुढे एक देखिल गाडी नाही, अशा सुनसान रस्त्यावरुन आम्ही चिडीचुप पणे चाललो होतो. वडीलांचे मित्र ड्राईव्ह करत होते, आजीं नी दिलेला सल्ला मानायला हवा होता अस प्रत्येकाच्या मनात येऊन गेल. पण तरी काका भिती ने का होईना गाडी दामटत होते.
तेवढ्यात दोन डोळे चमकले आणि काहीही कळायच्या आत कार ची समोरची काच धाडकन फुटुन एक भल मोठ्ठ धुड आत आल आणि थेट काकांच्या मांडीवर आदळल. दोन मिनीट आम्हाला कोणालाच काहीच कळल नाही, गाडी समोरच्या शेतातल्या झाडावर धडकली. गाडीचा वेग आटोक्यात असल्याने थोडाच धक्का बसला. आम्ही पटापट खाली उतरलो बघतो तर काकांच्या मांडीवर ड्रायव्हींग करायच्या पवित्र्यात एक हरिण बसल होत. त्याच बुड काकांच्या मांडीवर, पुढचे दोन पाय स्टेअरींग वर आणि शिंग टपाला लागत होती, अगदी आता ते गाडी चालवेल अस वाटत होत. ते दृश्य बघुन हसाव का रडाव ते कळेना. इतक अनपेक्षित घडल सगळ. की आम्ही अक्षरशः आ वासुन बघत होतो.
काका त्याला हुर्र, हैश करुन घालवायचा प्रयत्न करत होते ,पण ते स्टेअरींग आणी काकांची मांडी यात अडकुन बसलेल. वडीलांनी त्यांच्या साईड च दार उघडुन त्याला ढोसल, की जेणे करुन ते पलिकडुन उडी मारुन जाईल, पण ते ही मान हलवुन निषेध नोंदवत होत. कारण काका आणी हरिण यांच्या पैकी कोणालाच हलता सुद्धा येत नव्हत्. प्रसंग बाका होता. मदती ला कोणी यायची शक्यताच नव्हती कारण आजुबाजुला किर्र झाडी आणी शेतांशिवाय काहीही नव्हत. एक ही गाडी मागुन पुढुन पास होत नव्हती. त्याही परिस्थितीत काका म्हणाले, अगदी अढळ पद मिळाल्या सारख बसलय शिंच, हलायला तयार नाही. मी ही त्याला त्याच डीयर वाटलो का काय ? काकु म्हणत होत्या "अहो उतरा की खाली, काय तुम्ही पण अगदी कौतुकाने मांडीवर घेतल्या सारख बसलायत." "अग पण हलता येत नाहीये, आणी बहुतेक त्यालाही आवडलय मांडीवर बसायला" इती काका. बाकी हरण किती गोड ,गोंडस दिसत असल तरी हरणाची पण भिती वाटु शकते तेव्हाच कळल. मधेच त्याचे खुर हॉर्न वर आदळले की कर्कश्श हॉर्न वाजत होता आणि त्याला घाबरुन ते आपल अढळ पद आणखीनच अढळ करत होत. त्या किर्र काळोखात तो हॉर्न भयाण वाटत होता. जस्ट इमॅजिन !!
आम्ही आमच्या परीने त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत होतो, पण ते घाबरल्या मुळे कशालाच दाद देत नव्हत. त्या वेळी दृश्य अगदी फोटोजनिक होत. हरणाला मांडीवर घेतलेले काका, आजु बाजुने त्याला हाकलायचा प्रयत्न करणारे आम्ही, आणि शेतातल्या झाडावर आदळलेली गाडी. अगदी कैच्याकै.शेवटी म्हत्प्रयासाने वडीलांनी त्याचे त्याचे पुढचे खुर हातात घरुन जोरात ओढले आणी काकांच्या मांडी आणि स्टेअरींगच्या बेचक्यातुन त्याच बुड निघाल. त्या बरोब्बर काकांनी उजवी कडे आणि त्याने डावी कडे उडी मारली. आणी आमच्या कडे एक तुच्छ कटाक्ष टाकुन ते समोरच्या झाडीत दिसेनास झाल.
ह्या सगळ्या भानगडीत, काकांचा चष्मा फुटुन काचा गालात रुतल्या होता, हाताला प्रचंड खरचटुन रक्त येत होत, गाडीची समोरची काच पूर्ण फुटली होती. तरी त्यांची विनोद बुद्धी चांगलीच शाबुत होती.
त्या भर थंडीत सगळ्यांनाच घाम फुटला होता. काकांना तशा अवस्थेत गेवराईच्या सिव्हील हॉस्पिटल मधे घेऊन गेलो. रात्री च्या वेळी तिथे एक ज्युनियर डॉक्टर बाहेर आली आणी प्रथमोपचारा साठी काकांना आत घेऊन गेली , उपचार करताना ती विचारत होती कसा काय झाला अ‍ॅक्सीडेंट ?
अ‍ॅक्सीडेंट ?? अहो छे , हे सगळे हरणाचे प्रताप आहेत. काकांनी थोडक्यात तिला स्टोरी सांगीतली,
नक्की कुठुन आलेत हे अशा  अविर्भावात आळी पाळीने काकांकडे आणी बाबांकडे बघत होती. तिने टु बी अ‍ॅट सेफर साईड म्हणून सिनीयर डॉक्टर ना बोलवुन आणल.
काकांना कपाळाला दोन स्टिचेस घालावे लागले, डॉक्टरीण बाईंनी खरचटलेल्या जागी बँडेज लाऊन दिल. आम्ही पुन्हा भगदाड पडलेल्या गाडीतुन गार वारा अक्षरशः खात खात घरी आलो.
नंतर बरेच दिवस लोकांना हा विषय चघळायला पुरला.आमच्या वर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं आणि आम्ही ही गोष्ट विसरायला. नंतर काकांच नामकरण "हरणे काका" झालं.
काका म्हणले "बर झाल आपण हरणा मुळे वाचलो. थँक्स टु डियर "
आमच्या चेहेर्‍यावर प्रश्णचिन्ह . काका म्हणाले अरे जस्ट इमॅजिन हरणाच्या जागी वाघ किंवा बिबळ्या असता तर ??
हा अनुभव १०० % खरा आहे. ह्याची पुन्हा उजळणी व्हायच कारण म्हणजे , परवा "हरणे" काका आमच्या कडे येउन गेले . आणि आम्ही पुन्हा एकदा हरणा चा वाघ "जस्ट इमॅजिन" करुन मनसोक्त हसलो.